पुकार संशोधनासाठी वर्ष २०१०-११ साठी अॅडव्हान्स रिसर्च फेलोशीप अंतगर्त निवडलेल्या विषयासाठीचा अंतिम स्वरूपाचा प्रस्ताव
सारांश
मुंबई उपनगरीय लोकलसेवेदरम्यान अनेक प्रकारची कामे करणा-या असंघटीत कामगारांपैकी एक हमालांवर अभ्यास सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असणार आहे. असंघटीत कामगार म्हणून काम करतानाच हमालीच्या व्यवसायातील (अर्थाजन) मोबदला, हमालाच्या व्यवसायाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन, हमालीचा व्यवसाय करणा-या व्यक्तींची मानसिकता आदी बाबींचा अभ्यास सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये अधिकृत हमाल म्हणून काम करणा-या हमालांच्या तुलनेत असंघटीत क्षेत्रात हमाल म्हणून काम करणा-यांना सेवा सुविधा, रोजगारातील मोबदला, कामातील मानसिक समाधान आणि सामाजिक प्रतिष्ठा आदी बाबींवर प्रकाश प्रशासकीय पातळीवर बदल घडवता
येतात काय यासाठीचा एक प्रयत्न सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश ठेवूनच काम करण्यात येत आहे.
मुंबई उपनगरीय लोकलच्या सेवेमध्ये अपघातांच्यानंतर अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या कामगारांच्या सामाजिक, आर्थिक पार्श्र्वभूमी आणि कामाच्या ठिकाणच्या मानसिकतेचा अभ्यास करणे या विषयावर संशोधन करण्याच्या उदिष्टाने सदर विषयावर साहित्याचे पुर्नविलोकन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सदर विषयासाठी संशोधन करताना उपनगरीय लोकलच्या प्रवासादरम्यान होणारे अपघात काळजीपूर्वक अभ्यासण्य़ात आले. अपघाताची वेळ आणि प्रत्यक्षात जखमी प्रवाशाला हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी लागणारा वेळ पाहता अॅक्सीडंट हमालच एकमेव जीव वाचविणारी व्यक्ती त्यावेळी उपलब्ध असते ही गोष्ट प्रर्कषाने लक्षात आली.
मुंबई होणा-या दैनंदिन अपघातांची संख्या पाहता आणि गेल्या काही वर्षामधील अपघातांमध्ये मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांची संख्येची पडताळणी केल्यानंतर, असे लक्षात येते की वेळीच उपचार आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि मदत मिळाली असती तर अनेक प्रवाशांचे प्राण वाचले असते आणि त्याचप्रमाणे अनेकजण अपंग होण्यापासून वाचवता आले असते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी या कारभाराचा बळी ठरलेले आहेत.
भारतातीस बराचसा कामगार वर्ग हा असंघटीत आहे. त्यामुळेच तो शासकीय योजनांपासून दूर, वंचित आणि दुर्लक्षित राहिलेला आहे.
रेल्वे स्थानकांवर ओझे आणि प्रवाशांचे सामान उचलणारा रेल्वे हमाल हा त्यापैकीच एक.
रेल्वे हमालांचे त्यांच्या कामाच्या स्थितीनुसार तीन वर्गामध्ये वर्गीकरण करता येईल,
- परवानाधारक हमाल
- विनापरवानाधारक हमाल
- झिरो पोलिस
नेहमीचे ओझे उचलण्याच्या कामासोबतच रेल्वे हमाल आणखी एक महत्वाचे काम करतात ते म्हणजे अपघातानंतर अपघाती जखमी व्यक्तीला नजीकच्या रूग्णालयामध्ये पोहचवण्याचे. म्हणूनच त्यांना अॅक्सींडट किंवा स्ट्रेचर हमाल म्हणून संबोधले जाते.
अपघातानंतर नजीकच्या रूग्णालयामध्ये पोहचवतानाच जखमी व्यक्तीला प्रथमोपचाराची मदत करण्याचे कामदेखील हे हमाल करतात.
उपनगरीय लोकलच्या प्रवासादरम्यानच्या अपघातानंतर त्या प्रवाशाजवळ सर्वात पहिली कोणती व्यक्ती पोहचत असेल तर ती म्हणजे अॅक्सीडंट हमाल. एखाद्या अपघातानंतर स्टेशनमास्तरकडून सर्वप्रथम लोहमार्ग पोलिस आणि अॅक्सीडंट हमालाला अपघात झालेल्या ठिकाणाची माहिती देतात आणि त्यानंतर नजीकच्या हॅास्पिटलमध्ये त्या प्रवाशाला दाखल केले जाते ही सर्वसाधारण पद्धती. मात्र प्रवाशाच्या जीवाच्या किमतीच्या तुलनेत वेळीच मदत केलेल्या हमलाला केवळ तुटपुंज्या मानधनाच्या पैशांवरच समाधान मानावे लागते. जीवनाच्या किमतीच्या तुलनेत जीव वाचविण्यासाठी अपघातस्थळी पोहचणारा हमाल मात्र येथे जवळपास नगण्य किमतीचाच ठरतो.
हमालाच्या मजुरीच्या तुलनेत लोकलच्या प्रवाशाच्या जीवाच्या महत्वाकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की अपघातानंतर हमाली करणारा हा केवळ एक कामापुरता रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्यातील दुवा म्हणून मानला जातो. मात्र प्रत्यक्षात त्याच्या कामाचा मोबदला त्याठिकाणी योग्य प्रमाणात मिळत नाही ही वास्तविकता रेल्वेमार्फत देण्यात येणा-या मोबदल्यातून दिसून येते .
सदर हमालीच्या व्यवसायात काम करणारे आणि अपघातानंतर जखमी आणि मृत प्रवाशांचे देह उचलणारे अॅक्सीडंट हमाल मात्र कोणत्या जातीव्यवस्थेतून आलेले आहेत ? मुंबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारची कामे करण्यामागची नेमकी कारणे काय ? कोणत्या सामाजिक स्थरामधून हे हमाल अशा प्रकारचे काम करण्यासाठी येत असतात ?कोणत्या प्रकारची भाषा बोलतात ? कोणत्या भागातून अथवा जिल्हा, राज्यांमधून अशा प्रकारची कामे करण्यासाठी हे हमाल येत असतात ?कामाच्या बाबतीत एकमेकांमध्ये या हमालांचा संपर्क आणि ताळमेळ कसा असतो ? एखाद्या जखमी अवस्थेतील किंवा मृतावस्तेथील कोणतेही शरीर स्ट्रेचरच्या सहाय्याने उचलताना या व्यक्तींच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो ? या सर्व सामाजिक, आर्थिक आणि मानिसकतेशी संबंधित प्रश्नांची उकल सदर संशोधनातून करायची आहे.
स्ट्रेचर हमालांची सामाजिक स्थिती अभ्यासणे-
सामाजिक स्थिती अभ्यासताना जाती तसेच उपजाती, राहणीमान, मूळचे ठिकाण, कौटुंबिक स्थिती, शिक्षण, भाषा, साजरे केले जाणारे सण, उत्सव, समाजातील स्थान, सहभाग, सामाजिक सुरक्षा आदी भागांचा अभ्यास केला जाणार आहे.
आर्थिक स्थिती अभ्यासणे
स्ट्रेचर हमाल म्हणून काम करणा-या हमालांच्या रोजच्या उपजिविकेचे साधन काय ? रोजच्या कमाईतील नियमीतपणा आणि शाश्वती अभ्यासणे, दैनंदिन मिळकतीमधून कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो का यासारख्या आर्थिक बाबी सदर संशोधनातून पडताळवायाच्या आहेत. किमान वेतन कायद्यानुसार या असंघटीत क्षेत्रातील हमालांना रोजगार मिळतो काय हे अभ्यासणे.
हमालांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणे
मुंबई उपनगरीय लोकलसेवेच्या रोजच्या कामकाजात जखमी व्यतीच्या तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहून मानसिकतेवर काही परिणाम होतो काय ही स्थिती अभ्यासणे. अशा कामांमध्ये मानसिक तणाव किंवा त्याचे वेगळे परिणाम होतात काय याचा अभ्यास करणे.
संशोधनाचा प्रश्न – मुंबईसारख्या शहरामध्ये अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या अॅक्सीडंट हमाल या कामात सामाजिक स्थर, आर्थिक बाबींसोबतच कोणत्या मानसिकतेमध्ये काम करावे लागते ? या वास्तविकतेचा अभ्यास करणे.
संशोधनाचे ध्येय – मुंबई उपनगरीय लोकल सेवेत काम करणा-या अॅक्सींडट हमालांचा अभ्यास करणे.
संशोधनाचे उदिष्ट –
अॅक्सीडंट हमालांच्या विषयावर आत्तापर्यंतचे खूपच मर्यादित संशोधन झाले आहे हे साहित्याच्या पुर्निवलोकनासाठी घेतलेल्या प्राथमिक अभ्यासातून चित्र समोर आलेले आहे. संशोधन हे शोध स्वरूपातील असल्याने सदर संशोधनासाठी गृहितकांचा वापर न करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.
१. मुंबईसारख्या शहरामध्ये अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणार-या व्यक्तींचा सामाजिक स्थर आणि समाजात असणारे अभ्यासणे.
२. अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींच्या मजदुरीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे.
३. अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करताना त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अभ्यासणे.
संशोधनाची पद्धत –
सदर संशोधनासाठी शोध स्वरूपाच्या (exploratory) स्वरूपातील संशोधन पद्धती अवलंबली आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतीने संशोधन करण्यात येणार आहे. संशोधनाचा मर्यादित कालावधी पाहता सदर संशोधनामध्ये गुणात्मक पद्धतीने संशोधन करताना ठराविक हमालांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. हमाल म्हणून १० वर्षे काम करण्याचा अनुभव असणा-यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
संशोधनाचा कालावधी –
सदर संशोधनासाठी मुंबई उपनगरीय लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावरील अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-यांचा अभ्यास संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाचे संशोधन करून करण्यात येणार आहे. संशोधनासाठी असणारा मर्यादित ११ महिन्यांचा उपलब्ध कालावधी पाहता सदर संशोधनासाठी तिन्ही मार्गावरील ठराविक स्टेशनवरील अॅक्सीडंट हमालांचा अभ्यास करण्यात येणार आहे. संशोधनाच्या उपलब्ध कमी कालावधीमुळे मुलाखतीसाठी उपलब्ध असणारा कमी कालावधी ही संशोधनाची मर्यादा ठरू शकते.
No comments:
Post a Comment