Friday, February 18, 2011

जीवनवाहिनी बनली मृत्यूवाहिनी


गेल्या चार वर्षांत रेल्वे अपघातात १५ हजार १९५ 
जणांनी गमावले प्राण

सर्वाधिक अपघाताची ठिकाणे व अपघाताची संख्या (५ वर्षांतील)

कोपरी पूल (५८३)
दिवा ते कोपर स्थानकादरम्यान (५११)
ठाणे स्थानक (४३२)
विरार स्थानक (३५२)
वडाळा ते जीटीबीनगर स्थानकादरम्यान (३३३)
गोरेगाव स्थानक (२८४)
चेंबूर स्थानक (२७९)
कोपर ते डोंबिवली (२५७)

सहा वर्षांतील सर्वाधिक अपघाती मृत्यूंची नोंद करणारे पोलीस ठाणे

कुर्ला (५६४७)
मुंबई (३५०४)
वसई रोड (३३५९)
ठाणे (३१२४)
कल्याण (२८९५)
वांद्रे (२४९५)
बोरिवली (२३०६)

सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेतर्फे अनेक मोहिमा राबवूनही गेल्या चार वर्षांत मुंबईतील रेल्वे अपघातात १५ हजार १९५ लोकांनी विविध कारणास्तव आपला जीव गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे.


पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडणे, भरगच्च भरलेल्या लोकलमधून तोल जाऊन खाली पडणे किंवा हिरोगिरीकरण्याच्या नादात खाली पडणे अशा विविध कारणास्तव गेल्या चार वर्षांत १५ हजार १९५ प्रवाशांनी आपला जीव नाहक गमावला आहे. या आकडेवारीवरून मुंबईकर कशाप्रकारे रेल्वे पोलिसांकडून सुरक्षित प्रवासासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालतात हेच दिसते. गेल्या वर्षी तीन हजार ७१० अपघाती मृत्युंमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना दोन हदार १५२, रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये पडून सहा, चालू गाडीतून पडून ७३४ आणि चालू गाडीतून प्रवास करीत असताना रेल्वे पोलला धडकून १३ व इतर कारणाने ७९६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांना आळा घालण्यातील अडचणी मुंबईची लोकसंख्या वाढण्यासोबत लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानकांची संख्या वाढली आहे, रेल्वेचा आवाका वाढला आहे. एवढेच नव्हे, तर लोकल अपघात, गुन्हेगारी यांना आळा घालण्यात रेल्वे पोलिसांना मनुष्यबळ व साधनसामुग्री अभावी अडचण येत आहे. सुमारे ७० लाख मुंबईकर लोकलमधून प्रवास करतात. मध्य रेल्वेवर ९१ स्थानके व चार टर्मिनस आहेत, तर पश्चिम रेल्वेवर ३८ स्थानके व दोन टर्मिनस आहेत. रेल्वेच्या या आवाक्यावर देखरेख ठेवण्यासाठी अवघी साडेतीन हजार रेल्वे पोलिसांची फोर्स कार्यरत आहेत.


 वास्तविक रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांनी एकत्रितपणे ही जबाबदारी सांभाळणे अभिप्रेत आहे. मात्र दोन्ही यंत्रणांमध्ये दुजाभाव असून त्यातून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमा अपयशी ठरत आहेत. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी हमाल, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी तसेच रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. हातावर मोजण्याएवढय़ाच स्थानकांवर या सोयी उपलब्ध आहेत. अपघातानंतर अनेकदा व्यक्ती वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्युमखी पडते. त्यातही रुग्णवाहिका वेळेत न आल्याने ही परिस्थिती उद्भवते, असे अनेक प्रकरणांतून उघड झालेले आहे. वास्तविक मध्य रेल्वेवरील केवळ नऊ, तर पश्चिम रेल्वेवरील केवळ चार स्थानकांत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.     

No comments:

Post a Comment